२) रोज मातीत
*कल्पना दुधाळ*
*कवयित्री परिचयः*
कल्पना दुधाळ यांचा जन्म 12 ऑक्टोंबर 1978 रोजी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी या गावी झाला.
बालपण शेतीत कष्ट करता करता गेलं . अन् विवाह झाला तो ही शेतकरी कुटुंबात , त्यामुळे मातीशी एक अनामिक नातं त्यांचं तयार झाल . घर आणि शेती यांतील कष्टप्रद अनुभवातून त्यांची कविता स्त्रीवेदना प्रकट करत राहते , तशी प्रतिमा , प्रतीके त्यांच्या कवितेतून येत राहतात , गेल्या दहा वर्षात त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले . " सिझर कर म्हणतेय माती ' , ' धग असतेच आसपास ' या दोन्ही कवितासंग्रहातील कविता अस्सल जीवनभान व्यक्त करणाऱ्या आहेत . त्यांच्या कवितांत भोवतालची माणसं,निसर्ग , गुरं ढोरं , पशु - पक्षी , शेतीभाती , आजूबाजूचं वातावरण या सर्व घटकांना समावून घेणारी कविता कल्पना दुधाळ यांची आहे . ' सिझर कर म्हणतेय माती ' या काव्यसंग्रहाला ' कवी कुसुमाग्रज ' पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत . ' धग असतेच आसपास ' साठी ' महाराष्ट्र फाऊंडेशन ' चा ललित गंथ पुरस्कार मिळाला आहे .
*कवितेची मध्यवती कल्पना*
शेतकरी हा समाजजीवनाचा पाया आहे . भारत हा कृषिप्रधान देश आहे . शेतकऱ्याला साथ देणाऱ्या त्याच्या पत्नीचे कष्टही मोलाचे असतात . बाई कोणतंही काम हाताशी घेते तेव्हा ते मनापासून करण्याचा तिचा प्रयत्न असतो . मातीत पेरलेलं बीसुद्धा ती मायेने वाढवते , त्याला पाणी घालते , आपली धरतीमाय हिरवी व्हावी , शेत फुलावं यासाठी अपार कष्ट करते , घर , शेत या दोन्ही ठिकाणी कष्ट करून आपला संसार फुलवताना तिचे कष्ट दुर्लक्षिले जातात , त्याबद्दलचं दुःखही तिला नाही . पण त्याबाबतचं मन मोकळं गाणं या कवितेतून कवयित्री कल्पना दुधाळ मांडत आहेत .
*कवितेचा भावार्थ / आशय* :
कवयित्री कल्पना दुधाळ यांचे जीवन माती , शेतीशी बांधलं गेलंय . बालपणापासून शेतकरी जीवन अनुभवलेल्या या कवयित्री . ' रोज मातीत ' या कवितेत शेतात रावणाऱ्या शेतकरी स्त्रिची वेदना , कष्ट यांचे प्रकटीकरण कवयित्री करतात . कवयित्री म्हणतात सरीमध्ये , वाफ्यामध्ये कांद्यांची लागवड केली जाते . शेतकऱ्याबरोबर शेतकरीणसुद्धा ही लागवड करते . शेतकरी स्त्री ही लागवड करताना तिचा जीवही त्यासोबत लावते . कांद्याची लागवड करून काळ्या मातीवर ती हिरवेपणा गोंदते . पूर्वीच्या स्त्रीच्या अंगावर , कपाळावर गोंदण केलं जायचं . सध्याच्या काळात त्याला टॅटू म्हणून संबोधलं जातं , हे गोंदण हिरवं असतं . कवयित्रीने इथे काळ्या आईला आपल्या कष्टानं सजवलं आहे . पिकांचं हिरवं गोंदण काळया आईवर तिनं चढवलं . आपल्या घरात जशी बाई नांदते . घराचं घरपण कायम ठेवते .
पुढे कवयित्री म्हणते की, शेतात अमाप झेंडूचं फुलांची पीके आली आहे . त्यावरील सोनेरी फुलांनी अवघं शेत सोनेरी झालयं , ती फुलं तोडू नये असं तिला सतत वाटत राहतं . पण फुलांची शेती पैसा मिळवण्यासाठीच तर केलेली असते . फुल तोडताना तिला वाटत राहतं आपण या फुलझाडांचा देहच तोडतोय . हा फुलांचा देह तो तोडण्याचा आपल्याला काय बरं अधिकार आहे . बाईचाही देह कामाच्या व्यापाने अविरत श्रमाने तोडलाच जातो . तिचं मनही तोडल जातं , मनासारख्या सर्वच गोष्टी होत असतात असं नाही . तरी आपल्या घराच्या सुख , समाधानाकरता ती सर्व सहन करते. या तोडलेल्या फुलांनी ती आपल्या घराला सजवते . दाराला तोरणं बांधते . फुलांच्या सजावटीतून घराला शोभा आणते . आपल्या देहाचंहीं फूल करून घराला सुगंधी , शोभिवंत बाई करत असते . आपल्या घरात शेतात , शेतकरी बाई नांदते , सर्वांना सामावून घेत नांदते ,
शेतकरी स्त्री विविध पिकांची लागवड करते . शेतात ऊसाचंही पिक लावलं जातं . ऊस लावताना ऊसाच्या डोळयाच्या अलिकडचा - पलिकडचा ( डाव्या उजव्या) थोडा भाग असतो . ऊसाच्या डोळ्यासकट तो मातीत पुरावा लागतो . त्याला बेणं दाबणं असं म्हटलं जातं . पायाने हे बेणं मातीत दाबावं लागतं . शेतकरी स्त्री हे बेणं मातीत दाबते , त्याच्यासोबत ती तिचं मनही दावते , संसाराचे खाचखळगे भरताना अनेकदा तिला तिच्या इच्छा , आकांक्षा , स्वप्न बाजूला ठेवाव्या लागतात . आपल्या संसारासाठी सुगरण जशी काड्या काड्या जमवते तसं शेतकरी स्त्रीदेखील आपला संसार काड्या काड्या जमवून सांधते . संसार जोडला तरच तो टिकतो , ते जोडण्याचं , सांधण्याचं काम बाईच करते . या मातीत ती आपला संसार फुलवते .
शेतातलं काम कष्टाचं काम असतं , पीकासाठी कोळपणी करणं , लावणी , पाणी शेंदणे, कापणी करणं , मळणी करणं या सर्वात बाईला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात . घरातलीही सर्व कष्टाची कामं , शेतातलीही कष्टाची कामं , ही कामं करून आपण थकलोय हे म्हणण्याची तिला सोय नसते . शेतकरी घरातून निघताना वा घरी आल्यावर घरकाम करतोच असं नाही . पण शेतकरी स्त्रीला मात्र आपल्या पोराबाळांसाठी , सासरच्या माणसांसाठी कितीही थकली तरी चूल पेटवावी लागते . या कष्टांमुळे ती रोज मरणप्राय यातना सहन करते . रोज मरावं लागतं ते कष्टामुळे आणि सासरच्या त्रासामुळेही , पण तिला मरून कसं चालेल ? तिला कायम हिरवं रहावं लागतं . संसार उभा करायचा तर थकून चालणार नाही . ती आजारी पडली , थकली तर अवघा संसार ठप्प होईल , म्हणून सहन करत करत संसारमायेपोटी ती आपला उत्साह कमी करत नाही . शेतात लागवड केल्यावर विहिरीतील पाणी शेंदून शेताला पाणी पाजावं लागतं . ते पाणी खोल विहिरीतून शेंदताना प्रचंड जोर लावावा लागतो . हे पाणी शेंदणं , इतर सर्व काम या सर्वात ती नांदत राहते . आपल्या घरासाठी . शेतासाठी तो राब राब राबते .
अशाप्रकारे शेतकरी स्त्री आपला संसार फुलवण्यासाठी मातीत नांदत असते.
सुंदर स्पष्टीकरण आहे
ReplyDelete