वाक्यप्रकार
वाक्य प्रकार व वाक्यरूपांतर अभ्यासणे पूर्वी वाक्य म्हणजे काय हे अगोदर पाहू.
वाक्याचा अर्थ:-
आपल्या तोंडावाटे निघाणाऱ्या मूूूूूूूूूूलध्वनींना वर्ण म्हणतात. हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतात, ध्वनीच्या या चिन्हांना अक्षरे म्हणतात.ब,द,क, ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला. प्रत्येक वाक्य अशा अर्थपूर्ण शब्दांनी बनलेला आहे. वाक्यात केवळ शब्दांची रचना करून चालत नाही तर ती अर्थपूर्ण शब्दांची रचना असावयास हवी तेव्हाच ते वाक्य होऊ शकते.
वाक्या ची व्याख्या :-
"अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात ."
किंवा
" वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय ."
उदाहरणार्थ :-
' बदक पाण्यात पोहते.'
हे एक वाक्य आहे आणि या वाक्यात तीन पदे आहेत वाक्यात वापरलेल्या शब्दाला पोत म्हणतात.
वाक्य म्हणजे केवळ शब्दांची व्याकरणीक रचना नव्हे तर आशय आणि अर्थ व्यक्त करणारी रचना होय . वाक्य हे संपूर्णतः मानवी उच्चारण आहे.
आपण बोलताना, लिहिताना अनेक प्रकारची वाक्ये वापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो.
उदाहरणार्थ:- ‘काल खूप पाऊस पडला’,
हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते.
(१) काल फार पाऊस पडला. (विधानार्थी)
(२) काल काही कमी पाऊस पडला नाही. (विधानार्थी)
(३) काल काय कमी पाऊस पडला का? (प्रश्नार्थी)
(४) काल कमी तर पाऊस पडला नाही ना? (प्रश्नार्थी)
(५) किती अफाट पाऊस पडला काल! (उद्गारार्थी)
वाक्याचे प्रकार
(अ) आशयावरून आणि भावार्थावरून.
(आ) क्रियापदाच्या रूपावरून.
(अ) वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे
(१) विधानार्थी
(२) प्रश्नार्थी
(३) उद्गारार्थी
असे प्रकार आढळतात. ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात.
(१) विधानार्थी वाक्य-
ज्या"वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला ‘विधानार्थी वाक्य’ असे म्हणतात."
विधानार्थी वाक्य हे सर्व काळात व सर्व अर्थात वापरले जाते. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम येतो. कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते.
उदाहरणार्थ:-
(१) सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. (विधानार्थी)
(२) विटीदांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही.(विधानार्थी)
(३) बाबा पंढरपूरला गेले.
(४) शरद भरभर चालतो.
(५) मी इयत्ता बारावीत शिकतो.
• वरील वाक्यात विधान केले आहे.
• त्याचबरोबर वाक्यात माहिती दिली आहे.
• तसेच वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे.
(२) प्रश्नार्थी वाक्य-
"ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला ‘प्रश्नार्थी वाक्य’ म्हणतात."
प्रश्न विचारण्यासाठी सर्व काळाचा व सर्व अर्थाचा वापर केला जातो. ही वाक्य सुद्धा होकारार्थी आणि नकारार्थी असतात. नकारार्थी वाक्य ओळखताना वाक्यातील उणिवा,दोष,अभाव अशा नकारात्मक आशयावरून वाक्य ठरवायची नसतात तर ती क्रियापदाच्या रूपावरून ठरवायचे असतात.
उदाहरणार्थ:-
(१) तू बाहेर केव्हा जाणार आहेस? (प्रश्नार्थी)
(२) तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? (प्रश्नार्थी)
(३) कोण आहे तिकडे?
(४) तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही?
(५) गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये?
प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थक विशेषणे प्रश्नार्थक क्रियाविशेषणे याचा वापर केला जातो.
• वरील वाक्यात प्रश्न विचारला आहे.
• तसेच माहिती विचारली आहे.
• वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे.
(३) उद्गारार्थी वाक्य-
ज्या"वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो, त्या वाक्याला
‘उद्गारार्थी वाक्य’ असे म्हणतात."
अशा वाक्यांमध्ये मनातील तीव्र भावना व्यक्त केल्या जाते. व वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते तसेच उद्गारार्थी वाक्यात केवलप्रयोगी अव्यय असा वापर केला जातो.
उदाहरणार्थ:-
(१) किती छान आहे हे फूल! (उद्गारार्थी)
(२) शब्बास ! चांगले उत्तर दिलस!
(३) बापरे! केवढा मोठा साप हा!
• भावनेचा उद्गार काढलेला आहे
• वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे.
(आ) क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात.
(१) स्वार्थी वाक्य-
"ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला
‘स्वार्थी’ वाक्य म्हणतात."
उदाहरणार्थ:-
(१) मुले शाळेत गेली.
(२) खेळाडू मैदानावर सराव करतात.
(२) आज्ञार्थी वाक्य-
"ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश
आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला ‘आज्ञार्थी’ वाक्य म्हणतात."
उदाहरणार्थ:-
(१) ती खिडकी लावून घे. (आज्ञा)
(२) तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. (आशीर्वाद)
(३) देवा, मला सद्बुद्धी दे. (प्रार्थना)
(४) कृपया, मला तुझे पुस्तक दे. (विनंती)
(५) विद्यार्थ्यांनो, खूप मेहनत करा. (उपदेश)
(६) इथे पादत्राणे ठेवू नयेत. (सूचना)
(३) विध्यर्थी वाक्य-
ज्या"वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता,
इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला ‘विध्यर्थी’ वाक्य म्हणतात."
उदाहरणार्थ:-
(१) परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. (कर्तव्य)
(२) आज बहुतेक पाऊस पडेल. (शक्यता)
(३) अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. (योग्यता)
(४) विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. (इच्छा)
(४) संकेतार्थी वाक्य-
" ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते
अशी अट किंवा संकेत, असा अर्थनिघत असेल तर त्यास ‘संकेतार्थी’ वाक्य असे म्हणतात."
उदाहरणार्थ:-
(१) पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला
असता.
(२) मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन.